
राज्यातील गरीब, अत्यंत गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना वैद्यकीय, नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी सुरू केली आहे. या निधीचा उद्देश गरजूंना तात्काळ आणि पारदर्शक पद्धतीने मदत पोहोचविणे हा आहे. तर जाणून घेऊ या, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाबाबत….
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी:-
जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या गरजू रुग्णांना तातडीच्या व अत्यावश्यक आजारांसाठी तात्काळ उपचारासाठी आर्थिक सहाय्य देणे, गरजू रुग्णांना आर्थिक झळ न बसता मदत मिळावी याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. हा कक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीत सुरु करण्यात आला आहे. या कक्षाच्या वतीने गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना नियमित मदत दिली जात आहे.
1 मे 2025 पासून जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला असून 12 मे 2025 रोजी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या कक्षाच्या नियमित व दैनंदिन कामकाजासाठी राज्य शासनाच्यावतीने वैद्यकीय अधिकारी तथा कक्ष अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, लघुलेखक तथा सदस्य प्रमोद बागुल, सामाजिक वैद्यकीय अधिक्षक तथा सदस्य कपिल पिवाल यांची नियुक्ती केली आहे.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे :-
निदान व उपचारासाठी लागणा-या वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक (रुग्ण खाजगी रुग्णालय दाखल असल्यास सदरहू अंदाजपत्रक जिल्हा शल्यचिकित्सक यांचेद्वारा प्रमाणित करुन घेतलेले असावे). तहसलिदार कार्यालयाद्वारे प्रमाणित चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. (रु १.६० लाख असणे आवश्यक आहे). रुग्णाचे आधार कार्ड/लहान बालकांच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधारकार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, संबंधीत व्याधी विकार/आजाराचे संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत FIR रिपोर्ट आदी.
मदत मिळणारे प्रमुख 20 आजार :-
कॉकलियर इम्प्लांट/अंतस्त कर्ण रोपण शस्त्रक्रिया वय वर्षे २ ते ६, ह्दय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडणी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थीमज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशुचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधीत शस्त्रक्रिया, मेंदुचे आजार, ह्दयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात/विद्युत जळीत रुग्ण इत्यादी आजारासाठी मदत मिळते.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे :-
विहीत नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्यास त्याचा जीओ टॅग फोटो, निदान व उपचारासाठी लागणा-या वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक (रुग्ण खाजगी रुग्णालय दाखल असल्यास सदरहू अंदाजपत्रक जिल्हा शल्यचिकीत्सक यांचेद्वारा प्रमाणित करुन घेतलेले असावे). तहसलिदार कार्यालयाद्वारे प्रमाणित चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. (रु १.६० लाख प्रती वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे). रुग्णाचे आधार कार्ड/लहान बालकांच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधारकार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, संबंधीत व्याधी विकार/आजाराचे संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत FIR रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णांसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीची मान्यता आवश्यक आहे. अर्थसहाय्याची मागणी ऑनलाईन पध्दतीने अर्थात ई-मेलद्वारे केलेली असल्यास मूळ अर्जासह सर्व कागदपत्रे एकत्रितरित्या वाचनीय अशा पीडीएफ स्वरुपात पाठविण्यात यावेत.
अर्ज करण्याची पद्धत व अट :-
विहित नमुन्यात अर्ज भरुन, आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत आणल्यास मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामधून सदरील अर्ज (E-mail ID: aao.cmrf.mhgov.in) ई-मेलद्वारे पाठविण्यात येतो. त्यानंतर सदरील अर्जात नमूद माहितीच्या आधारे रुग्णांचे सहाय्यता निधी मंजूर करण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी/धर्मादाय/मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालय असणे आवश्यक आहे. रुग्णांवर करण्यात येणारे उपचार हे सीएमआरएफ अंतर्गत मान्यताप्राप्त असावे व आजार यादीत असावा.
एकूण किती रक्कम मिळते :-
रुग्णालयाने दिलेल्या कोटेशनच्या आधारे उपचारास आवश्यक असेल तेवढाच निधी देण्यात येतो. १ जानेवारी ते ३० जून, २०२५ या कालावधीत धुळे जिल्ह्यातील ६ रुग्णांना ४ लाख ९० हजाराची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. यात चि. शिव योगेश पाटील वय वर्षे -३ या बालकास हर्नियाचा आजार होता. त्यासाठी महागडी शस्त्रक्रिया आवश्यक होती. सदर बालकाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी सदर शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे संपर्क केला असता, कक्षातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सदरबाबतीत अर्ज व इतर कागदपत्रे पुर्तता करुन सदर बालकाच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथून ४००००/- रुपये मंजूर करुन सदर हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. या बालकाच्या पालकांनी मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांची व येथील वैद्यकीय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. तसेच योगेश शिवनाथ गवळी, राहुल गोपीनाथ भोई, नितेश अशोक महाले, आशाबाई हिरालाल वाणी, प्रकाश मंगा भामरे यांनाही मदत देण्यात आली आहे.
एफसीआरए मान्यता – आंतरराष्ट्रीय देणगीसाठी दार खुले :-
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एफसीआरए मान्यता मिळाली असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी संकलनासाठी परदेशातून विविध व्यक्ती व संस्था यांच्यावतीने आर्थिक मदत स्वीकारणेसाठी भारत सरकारच्या आर्थिक निकषाच्या सर्व बाबी पडताळून व आवश्यक त्या शासकीय परवानगी मिळणेबाबतचा सर्व विषय एफसीआरएमार्फत होत असतो. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एफसीआरए चे सर्व निकष परिपूर्ण होवून विदेशातून व्यक्ती व संस्थामार्फत सदर कक्षास आर्थिक देणगी मिळण्याची परवानगी मिळालेली आहे. व संपूर्ण देशात याबाबत महाराष्ट्र हे प्रथम व एकमेव राज्य आहे. एफसीआरएला मान्यता मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी कक्षाच्यावतीने आर्थिक मदत देणे सुलभ होणार आहे.
धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:-
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय मदत कक्ष,
माहिती व जनसंपर्क भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे.
किंवा ई-मेलद्वारे (aao.cmrf-mh@gov.in) पाठवावीत. अर्ज केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकाच्या साहाय्याने https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action या संकेतस्थळावर अर्जाची सद्यस्थिती तपासता येते.
मुख्य कीवर्डस (Keywords):-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी,जिल्हास्तरीय मदतकक्ष,धर्मादाय रुग्णालय,आरोग्य सेवा,आर्थिक मदत,उपचारासाठी सहाय्यता,गरीब रुग्णांसाठी मदत,आरोग्य सुविधा,सरकारी मदत योजना,सामाजिक कल्याण,वैद्यकीय सहाय्यता,आरोग्य मंत्रालय,रुग्ण मदत कक्ष,आरोग्य विमा,सेवाभावी संस्था.